Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी - चंद्रकांत पाटील.


      पुणे; (शशिकांत पाटोळे) : पुणे महानगरपालिकेत चार वर्षांच्या प्रशासक राजनंतर महापौर आणि उपमहापौर निवड झाली आहे. भाजपच्या मंजुषा नागपुरे या महापौरपदी तर रिपाइंचे परशुराम वाडेकर उपमहापौरपदी निवडून आले आहेत. त्याचबरोबर इतर समित्यांची ही नेमणूक झालेली आहे. विशेषतः भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

      याबाबत महापौर निवडीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत येऊन महत्वाचे विधान केले आहे. यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा मावळल्या असून टेन्शन देखील वाढलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपचे स्पष्ट धोरण आहे की, महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार नाही.

        स्वीकृत सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी नव्हे, तर केवळ अडीच वर्षांसाठी केली जाणार आहे. यामुळे सुमारे १४ कार्यकर्त्यांना ही संधी मिळेल. मात्र, प्राधान्य अशा कार्यकर्त्यांना दिले जाईल ज्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघटनात्मक काम करत आहेत."

       या घोषणेमुळे निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे, जे स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून पुन्हा सभागृहात येण्याची शक्यता पाहत होते. दुसरीकडे, पक्षाच्या ग्राउंड लेव्हलवर वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या, पण आतापर्यंत सत्तेच्या फायद्यापासून दूर राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही संधी सोनेरी ठरणार आहे.

      मात्र, महापालिकेतील सत्तासमीकरणे आणि अंतर्गत गटबाजी लक्षात घेता, हा नियम कठोरपणे पाळला जाईल की काही नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तींसाठी अपवाद केला जाईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तसेच स्वीकृत नगरसेवकांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments