
भोसरी (प्रतिनिधी):- मोशी परिसरातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ४० वर्षीय इसमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामू कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पीडित मुलीची आई व आत्या यांनी खिडकीतून हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यानुसार कलम ४, ६, ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



0 Comments