Hot Posts

6/recent/ticker-posts

पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले...

      पुणे; दि.१४ (शशिकांत पाटोळे) : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आज संपूर्ण देशाने अभिवादन केले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

      पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जवानांच्या अदम्य साहसाचा गौरव केला. त्यांनी लिहिले की, "२०१९ मध्ये आजच्या दिवशी पुलवामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या  शूर वीरांचे स्मरण करताना, त्यांची भक्ती, दृढनिश्चय आणि देशसेवा नेहमीच आपल्या मनात राहील. प्रत्येक भारतीय त्यांच्या धाडसातून शक्ती मिळवतो. जवानांच्या या त्यागामुळेच देश सुरक्षित असून त्यांचे शौर्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

• उपराष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली..

       उपराष्ट्रपतींनी देखील या प्रसंगी जवानांच्या सर्वोच्च त्यागाचा गौरव केला. ते म्हणाले, "पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मृतीत नेहमीच कोरले जाईल आणि एक मजबूत आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील."

• 'तो'काळा दिवस!

       १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन आदळले. या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले.

Post a Comment

0 Comments