Hot Posts

6/recent/ticker-posts

नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश..

        पुणे; दि.१२ (शशिकांत पाटोळे) : पुणे शहरातील नदीपात्रांमध्ये बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्याच्या वाढत्या घटनांची महापौरांनी गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषतः टिळक पुलाच्या शेजारी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

       महापौरांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवू शकते आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

       नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी २४ तास भरारी पथक नेमण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत हे पथक नेमके काय काम करत आहे, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. शहर स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

       ज्या भागातून नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आला आहे, त्या भागातील संबंधित आरोग्य निरीक्षक व बांधकाम निरीक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राडारोडा किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा नदीपात्रात टाकणाऱ्या व्यक्ती, ठेकेदार किंवा संस्थांवर तात्काळ दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर शिक्षा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

      यापुढे अशा घटना टाळण्यासाठी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रांची नियमित पाहणी करावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कारवाई करावी. गरज भासल्यास सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्व्हे तसेच विशेष पथके नेमून नियंत्रण ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

      “नदी स्वच्छता आणि संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे नमूद करत नागरिकांनीही अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ संबंधित क्षेत्रीय कार्यालयास कळवावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

      दरम्यान, या आदेशानंतर प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments