Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांचा राष्ट्रपती विशेष पुरस्काराने गौरव..

        पुणे, दि. १४ डिसेंबर २०२५ -: ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व आदर्शवत कार्य केल्याबद्दल ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज जगदंबा भवन, पुणे यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण भारतातून “ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट” या प्रतिष्ठित श्रेणीत जगदंबा भवनची निवड करण्यात आली.

         ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना, ऊर्जेचा किफायतशीर व विवेकपूर्ण वापर, नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा अवलंब, तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीला चालना देणारे उपक्रम यामुळे जगदंबा भवनची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध यंत्रणा आणि सर्व निवासी सदस्यांचा सक्रिय सहभाग हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

           जगदंबा भवन परिसरात वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रणालीचा वापर, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची अंमलबजावणी, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजनाचा अधिकाधिक उपयोग, तसेच ऊर्जा संवर्धनाबाबत नियमित जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमुळे केवळ ऊर्जा बचतच झाली नाही, तर कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट साध्य झाली आहे.

        या सन्मानामुळे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली याविषयीच्या दूरदृष्टीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजात ऊर्जा बचतीविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून शाश्वत विकासाचा संदेश दिला जात आहे.

        हा राष्ट्रपती पुरस्कार केवळ एका संस्थेचा सन्मान नसून, देशभरातील निवासी संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांसाठी ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments