पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ सनई-चौघड्याचे सूर… नगारा, संबळ, तुतारी वादन करणारे कलाकार… जिवंत देखाव्यासाठी पारंपरिक पेहरावात सज्ज झालेले बालशिवाजी… नऊवारी, चंद्रकोर आणि फेटा अशा पेहरावातील महिला कार्यकर्त्या… ढोल-ताशा पथक, बंदपथकाचे वादन… लेझीम, लाठी-काठी आणि वैतचर्म प्रात्यक्षिक सादर करणारी तरुणाई… तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती ९६ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष अशा मंगलमय वातावरणात शिवकाल गुरुवारी पुन्हा एकदा पुण्यामध्ये अवतरला.
शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या मिरवणुकीचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, आमदार हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १४ वे वर्ष होते.भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्ध प्रात्यक्षिके सादर केली.
नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. आयोजन समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांच्यासह स्वराज्यबांधवांनी याचे आयोजन केले होते.
मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, अटकवीर सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निवंगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडु, आढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सूर्याजी काकडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजीराजे जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोंदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत धार राजेपवार, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शूरवीर एकोजी शिरोळे, शूरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शूरवीर सावंत स्वराज्यघराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे, सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे स्वराज्यरथ गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.

0 Comments