पिंपरी चिंचवड-: निगडी सेक्टर क्रमांक २२ येथील श्रीराम हाऊसिंग सोसायटी परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेले ड्रेनेजचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून अर्धवट स्थितीत तसेच पडून आहे. रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेजसाठी खोदकाम करून माती व दगड तसेच ठेवण्यात आले असून, उर्वरित पाईप्स रस्त्याच्या कडेला तसंच पडून आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा, अस्वच्छता आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) - सामाजिक न्याय विभागाचे शहर सचिव श्री. सुनिल कांबळे यांनी आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. 

सुनिल कांबळे म्हणाले की, "महापालिकेने विकासकामे सुरू ठेवावीत, याबाबत आमचा विरोध नाही. मात्र कामे वेळेत व दर्जेदाररित्या पूर्ण होणे गरजेचे आहे. अर्धवट कामांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. अशा दुर्लक्षित भागांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे."
सदर भागात वृद्ध नागरिक, शाळकरी मुले, महिला यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पावसाळा सुरू होत असताना अशा परिस्थितीत रस्त्यावरील अर्धवट काम अपघातास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे महापालिकेने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

0 Comments