Hot Posts

6/recent/ticker-posts

मावळ लोकसभा! उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी आज

 

              मावळ,दि.७ मे २०२४ -: मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी  तपासणी आज आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. 

       भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी आज पार पडली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, याद्वारे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण तीन टप्प्यात  करण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने आज उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी विहीत वेळेत पार पडली. तसेच उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी दि. ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहीत वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. 

       निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. 

       आज झालेल्या दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळेल त्यांना देखील नोटीस बजावण्यात येईल, असे देखील खर्च व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

       केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.

        लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ९५  लाख रूपये इतकी आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम,१९५१ कलम ७८ अन्वये निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत उमेदवाराने हिशोब दाखल करणे आवश्यक आहे. 


Post a Comment

0 Comments