Hot Posts

6/recent/ticker-posts

मावळ लोकसभा मतदारसंघात सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न.

 

            मावळ दि.६-: भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करण्यासाठी निवडणूक यंत्रणा काम करत असते. ही सर्व प्रक्रिया निष्पक्ष, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडली जावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि महत्वाची असते. त्यामुळे सूक्ष्म निरीक्षकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांनी दिले. 

चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण सत्र आज पार पडले. या प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करताना निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे सहाय्यक प्रशिक्षण समन्वय अधिकारी तथा पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त राजू नंदकर, मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, संबंधित अधिकारी आणि पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नियुक्त सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते. 

       प्रगल्भ लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मतदान प्रक्रिया अत्यंत महत्वाची तसेच संवेदनशील असते. भारतीयांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब या प्रक्रियेतून उमटत असते. त्यामुळे ही प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेची असते. यामध्ये सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि महत्वाची असते. त्यामुळे सूक्ष्म निरीक्षकांनी त्यांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांनी दिले. 

      महाराष्ट्र शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय राज्य आहे. प्रशासकीय यंत्रणेला संपुर्ण सहकार्य करण्याची मानसिकता या राज्यातील नागरिकांची आहे, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निश्चितपणे शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

       मावळ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८३ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूकीच्या दिवशी संवेदनशील मतदान केंद्रावर तसेच गृह मतदानासाठी या सूक्ष्म निरीक्षकांकडे महत्वपुर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण सहाय्यक प्रशिक्षण समन्वयक अधिकारी राजू नंदकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिले. यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका, कर्तव्य, जबाबदारी, निवडणूक प्रक्रियेचे विविध पैलू, भारत निवडणूक आयोगाचे नियम, मार्गदर्शक तत्वे याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबतचा अहवाल वेळेत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करणे, विहीत नमुन्यात अहवाल सादर करत असताना घ्यावयाची काळजी, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निरीक्षण करण्याची प्रक्रिया, मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास घ्यावयाची दक्षता, मॉक पोल योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पडताळणी, निवडणूक निरीक्षकांना संवेदनशील माहिती जलद गतीने पुरविणे, मतदारांची ओळख योग्य पद्धतीने होत आहे की नाही याचे निरीक्षण करणे, मतदान केंद्रावरील कर्मचारी योग्य पद्धतीने कामकाज करतात किंवा नाही हे पाहणे, मतदान प्रक्रिया पार पाडत असताना गोपनियता जपली जात आहे की नाही हे पाहणे, मतदान प्रक्रियेला बाधा ठरणारी परिस्थिती उद्भवल्यास याबाबतचा संदेश तात्काळ निवडणूक निरीक्षकांना देणे, गृह मतदानावेळी संपुर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होते किंवा नाही याबाबतची पाहणी करणे, मतदार कुठल्याही प्रभावाखाली न येता मतदान करतील याबाबतची दक्षता घेणे तसेच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची पुर्तता पुर्ण झाली किंवा कसे, अशा विविध बाबींबद्दल विस्तृत मार्गदर्शन प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात आले. 



Post a Comment

0 Comments