
पुणे; दि.१६ (शशिकांत पाटोळे) : कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी, टी-२० विश्वचषक २०२६ चा रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तानचं गणित जर तर वर आलं आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इशान किशनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत सात गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ १८ षटकांत १० गडी गमावून ११४ धावाच करू शकला.
• टीम इंडियाचा आठवा विजय…
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपला विक्रम आणखी मजबूत केला. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी मात करुन एकूण आठवा विजय मिळवला आहे.
• कसा झाला सामना..
विजयासाठी १७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघातील उस्मान खान याचा अपवाद वगळता इतर एकाही प्रमुख फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. उस्मान खान याने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी शाहिन अफ्रिदी याने नाबाद २३ धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. शादाब खान याने १४ आणि फहीम अश्रफने १० धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त इतर सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवून मोहिम फत्ते केली.
तत्पूर्वी, इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने २० षटकात ७ विकेट गमावत १७५ धावा केल्या होत्या. भारताकडून इशान किशनने अर्धशतक झळकावले. (India set a target of 176 runs for Pakistan, Ishan Kishan scored a half century.) या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. टीम इंडियासाठी एकूण ५ फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर २ प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
अभिषेक शर्मानं चार चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातंही खोलता आलं नाही. या स्पर्धेत तो सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियावर याच्यापेक्षा संजू सॅमसन बरा अशी चर्चा रंगली आहे. अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो तंबूत परतला होता.
भारतासाठी इशान किशनने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार मारत १९२.५० च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. सैम आयुबच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या चुकला आणि त्रिफळाचीत झाला.याव्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या.
भारताकडून शिवम दुबे २७ धावा करून बाद झाला तर तिलक वर्माने २५ धावा केल्या. तिलक वर्मानंतर हार्दिक पांड्याही शून्यावर माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेला रिंकू सिंग हा चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत सैम अयुबने तीन, तर सलमान आगा, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांसह १८ षटके टाकली. खेळपट्टीचा विचार करता, पाकिस्तानने प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीचा वापर केला. फिरकी गोलंदाजांनी १८ षटके टाकली, तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने उर्वरित २ षटके टाकली. संघाकडून ६ फिरकी गोलंदाजांसह एकूण ७ गोलंदाजांनी गोलंदाजी केली.
• टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसमोर मोठा रेकॉर्ड…
भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, टीम इंडियाची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील १७५ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी २०२२ साली पाकिस्तान विरुद्ध ७ विकेट्स गमावून १६० धावा केल्या होत्या.
0 Comments