पुणे; दि.१० (शशिकांत पाटोळे) : हडपसर परिसरातील एका दुचाकी विक्री दालनातून पावणेतीन लाख रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या कामगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
आरोपीकडून चोरीस गेलेली दुचाकी तसेच अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, सध्या रा. कैलासनगर, वडकी, हडपसर–सासवड रस्ता, मूळ रा. निळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर भागातील संबंधित दुचाकी विक्री दालनात कामगारांचे वेतन देण्यासाठी दालनाच्या मालकाने कप्प्यात दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड ठेवली होती. याच दालनात काम करणाऱ्या बापूराव गायकवाड याने संधी साधून ही रोकड चोरली आणि पसार झाला.
रोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच दालनाच्या मालकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत मालकाने आरोपी कामगारावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली.
त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि अडीच लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुचाकी विक्री दालनातून कामगार गायकवाड याने रोकड चोरल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस कर्मचारी प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाड याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख ५९ हजार रुपये आणि दुचाकी असा तीन लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक अभिजित पवार, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, नासीर देशमुख यांनी ही कामगिरी केली.

0 Comments