Hot Posts

6/recent/ticker-posts

पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा केला अपहार.

        पुणे; दि.१३ (शशिकांत पाटोळे) : पेट्रोल पंपावर तब्बल १६ वर्षे व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या विश्वासू कर्मचाऱ्याने तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पंपाचे भागीदार अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा.मगरपट्टा सिटी, हडपसर)यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, रा.घोरपडे वस्ती, शांती किरण सोसायटी, कदमवाकवस्ती, ता.हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर प्रकार हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या’ ऑटो कॉर्नर’ या पेट्रोल पंपावर घडला आहे.बनावट टेस्टींग नोंदी, ग्राहकांच्या रक्कमा थेट वैयक्तिक बँक खात्यात वळवणे तसेच कॅशियरकडून फसवणुकीने रोख रक्कम उचलणे अशा चार प्रकारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहे.

        पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय काळे हे आई विजया काळे यांच्यासह ‘ऑटो कॉर्नर’ पेट्रोल पंपाचे भागीदार आहेत. या पंपावर सन २००८ पासून रायपुरे हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता.सन २०१७ मध्ये अक्षय काळे यांच्या वडिल बाळकृष्ण काळे यांचे निधन झाल्यानंतरही पंपाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रायपुरे याच्याकडे कायम ठेवण्यात आली होती.

       परंतु रायपुरे याने हिशोब देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संशय बळावल्याने अक्षय काळे यांनी मामा प्रविण खेडेकर यांच्या मदतीने सन २०१८ पासूनचे सर्व डेली सेल्स रेकॉर्ड,कॅशियर शीट व बँक स्टेटमेंट तपासले.यामध्ये त्यांना बनावट टेस्टींग नोंदी आढळून आल्या.

       तसेच ग्राहकांच्या रक्कमा पेट्रोल पंपाच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असलेल्या रायपुरे याच्या वैयक्तिक बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत जाब विचारताच रायपुरे याने चक्कर आल्याचे नाटक करत रुग्णालयात दाखल होऊन पंपावर येणेच बंद केले.यानंतर चार्टर्ड अकाउंटंटमार्फत ऑडिट करण्यात आले.

       यात तब्बल २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.

Post a Comment

0 Comments