
पुणे : पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहरात मोठी राजकीय खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांना पुण्यात लॉटरी लागलीये. नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील विविध प्रभागांमधील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या जुन्या पक्षांना रामराम ठोकला अन् अजित पवार गटात प्रवेश केलाय. सोमवारी झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांना धक्के बसले. नेमकं काय घडलं? पाहा
• पुण्यातील १२ बड्या शिलेदारांची दादांना टाळी..
पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात उतरण्यापूर्वी भाजप, मनसे, काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांतील १२ बड्या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे धनंजय जाधव, मुकारी अलगुडे, शंकर पवार, प्रकाश ढोरे, बाळासाहेब रानवडे आणि मधुकर मुसळे यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसचे दत्ता बहिरट, विनोद रणपिसे, मनसेचे जयराज लांडगे, शिवसेना ठाकरे गटाच्या नीता मांजळकर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंद मांजळकर आणि शरद पवार गटाचे स्वप्निल दुधाने यांनीही अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलंय.
दरम्यान, अजित पवारांनी या प्रवेशांद्वारे पुण्यात मोठी 'इनकमिंग' घडवून आणली असून, पुणे पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. या १२ नेत्यांच्या प्रवेशामुळे अनेक महत्त्वाच्या प्रभागांमधील समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे, या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यात युती केल्याने आणि आता या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे पुण्याची लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
• भाजपमध्ये घराणेशाही...
दरम्यान, भाजपचे वरिष्ठ दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सुनेला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गिरीश बापट यांची सून स्वरादा बापट यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये. त्याचबरोबर कसबा विधानसभाच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी भरणार आहेत.

0 Comments