भाजपचा उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव गेले काही दिवस सुरू होता. मात्र आता उमेदवारी दाखल करण्यासाठी काही तास उरले असताना देखील अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असताना भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नसल्याचे समोर आले आहे.
भाजपकडून ज्यांची उमेदवारी फिक्स झाली आहे, अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जात आहे. त्यांना पक्षातर्फे ए, बी फॉर्मही पोहोचवले जात आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे. आतापर्यंत गणेश बिडकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनाही भाजपने एबी फॉर्म दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपची उमेदवार यादी २६ डिसेंबरला जाहीर होईल, असे सांगितले होते. नंतर २८ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती देण्यात आली होती.
मात्र, आता अधिकृत यादी जाहीर न करता, उमेदवारी निश्चित झालेल्यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून फोन केले जात आहेत. आज उमेदवारांना पक्षातर्फे गुप्तपणे ए आणि बी फॉर्म दिले जात आहेत. यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप मधून पहिला अधिकृत अर्ज गणेश बिडकर यांनी दाखल केला आहे. त्यासोबत सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक यांनी देखील देखील अर्ज दाखल केले आहेत. तसेच काही नेत्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले असून काही नावे समोर आले आहे. मात्र या नावाची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
• यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा?
स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर, राघवेंद्र मानकर, गणेश बिडकर, कल्पना बहिरट, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला गणेश यादव, विशाल धनवडे, प्राजक्ता गडाळे, पल्लवी जावळे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, योगेश मुळीक, सायली वांजळे, अर्चना पाटील, शंतनू कांबळे, सम्राट थोरात, सुजाता काकडे,
भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारांची यादी आता अंतिम करण्यात आली असून उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येत आहेत. अनेक दिवसांपासून भाजपची उमेदवारी मिळेल म्हणून आस लावून बसलेल्या नेत्यांच्या आशा मावळल्यानंतर हे उमेदवार अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच 'जिजाई' या बंगल्यावर रांगा लावू लागले आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळालं नसल्याने नाराज झालेल्या एका माजी नगरसेवकानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी जात पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जाधव हे प्रभाग क्रमांक २७ मधून इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या जाधव यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.
२०१२ च्या निवडणुकीमध्ये धनंजय जाधव हे भाजप पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. मात्र, २०१७ च्या निवडणुकीमध्ये धनंजय जाधव यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणि पराभवानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये येत आपलं काम सुरू ठेवलं होतं.
मागील निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र यंदा तरी आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा धनंजय जाधव यांना होती. मात्र उमेदवारी मिळणार नाही याबाबत खात्री झाल्यानंतर सोमवारी (ता.२९) त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणे भाजपाला दिवसातला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार हेही जाधव यांच्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. तेही अजितदादांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले आहेत.
यासोबतच आणखी दोन धक्के आज भाजपाला बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज जिजाई बंगल्यावर भाजपमधील नाराजांची रांग लागण्याची शक्यता असल्याचं वर्तवलं जात आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना धनंजय जाधव म्हणाले, गेले पंचवीस वर्षे मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भाजपकडून नगरसेवक म्हणून देखील निवडून आलो होतो. पक्षाचा निष्ठावंत म्हणून मी काम केलं. तरीही पक्षकार्यालयामध्ये सहभागी नाहीत अशांना उमेदवारी दिली जात आहे. निष्ठावंतांना डावल जात असल्याचा आरोप देखील धनंजय जाधव यांनी केला असून त्यामुळेच आपण पक्ष निर्णय घेतला असल्याचं जाधव म्हणाले.
प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी मधून ऐन वेळेस तिकीट नाकारल्या कारणाने माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, बाळासाहेब रानवडे, अॅड मधुकर मुसळे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे आता प्रभाग क्रमांक ८ मधील थेट लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार आहे. आणि याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.



0 Comments