पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक ; २२ फेब्रुवारी २०२६ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात धान्य भरडण्याचे काम सुरू असताना मळणीयंत्रात स्कार्फ आणि केस अडकल्याने एका ४१ वर्षीय महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
ही घटना कुरंगवडी (ता. भोर) गावच्या हद्दीत शनिवारी ११ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुरंगवडी येथील शुभांगी निलेश राऊत (४१) या शनिवारी सकाळी आपल्या शेतात मसूर आणि वाटाणा मळणीचे काम करत होत्या. यावेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या धान्य भरडण्याच्या मशीनशेजारी त्या कार्यरत होत्या.
धान्य भरडत असताना त्या खाली वाकल्या. अचानक त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस मशीनमध्ये अडकले. मशीन सुरू असल्याने त्या वेगाने आत ओढल्या गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक जयेंद्र राऊत, संतोष शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ कांटे यांनी तातडीने मशीनमधून त्यांना बाहेर काढले. शुभांगी यांना तातडीने उपचारांसाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुरंगवडी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत

0 Comments