
पुणे-: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचं निधन झालंय. राञी ८:२५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुना हॉस्पिटल मधे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबा आढाव यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
१९३६ मध्ये पुण्यात जन्मलेले बाबा आढाव हे पाच भावंडांतील धाकटे. आईचे निधन लवकरच झाले आणि वडिलांच्या अनुपस्थितीत आजोळ्यात वाढले. विज्ञान शाखेत बी.एस्सी. पदवी आणि आयुर्वेदात पदवीधर म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले. १९५३ मध्ये घरातच दवाखाना सुरू करून त्यांनी गरीब रुग्णांना मोफत सेवा दिली. ही सुरुवातच त्यांच्या शोषितांप्रतीची संवेदनशीलता दर्शवते.
• कामगार चळवळ आणि संघटनात्मक योगदान....
असंघटित कामगारांच्या नेते म्हणून ओळखले जाणारे आढाव हमाल पंचायतीशी जोडले गेले. १९६२ ते १९७१ पर्यंत पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी झोपडीवासीयांसाठी ‘झोपडी संघ’ स्थापन केला. १९५२ च्या अन्नधान्य भाववाढविरोधी सत्याग्रहापासून ते गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत ते अग्रभागी होते. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेची स्थापना करून धरणग्रस्तांना न्याय मिळवून दिला.
• सामाजिक न्याय आणि विषमता निर्मूलन.....
एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमता निर्मूलन समितीचे प्रमुख कार्य त्यांनी केले. सत्यशोधक चळवळीचे नेते म्हणून दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्याक, अपंग आणि कष्टकरी यांच्या हक्कांसाठी अथक संघर्ष केला. आणीबाणी काळात प्रचंड मेळावे घेऊन १६ महिन्यांचा कारावास भोगला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य म्हणून नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अंधश्रद्धाविरोधी लढा दिला.
• वारसा आणि प्रेरणा...
आढाव यांनी आपल्या आयुष्यभरात संसदबाहेरील कार्यकर्त्यांसाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारला आणि विविध परिवर्तनवादी संस्थांना एकत्र आणले. ‘सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार’ ही महात्मा फुलेंची सुचिता त्यांनी जपली. सहकार्य सत्तेत गेल्यानंतरही ते समताधिष्ठित लोकशाहीसाठी झटले. त्यांचा अखंड संघर्ष आणि शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवण्याचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे.
0 Comments