पिंपरी, दि.२७ नोव्हेंबर २०२५: देहू रोड कॅंटॉन्मेंट बोर्ड येथील संरक्षण दलाच्या जवानांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्राला नुकतीच भेट दिली. ही भेट देण्यामागे अग्निशमन विभागाचे कामकाज जाणून घेणे, अग्निशमन विभागाच्या गाड्या तसेच इतर संसाधनांची माहिती घेणे आणि अग्निशमन विभागाच्या जवानांसोबत सराव करणे हा मुख्य उद्देश होता.
अग्निशमन विभाग कशाप्रकारे काम करतं हे जवळून जाणून घेण्यासाठी संरक्षण दलाचे ६० जवान उपस्थित होते. अग्निशमन विभागातर्फे वरिष्ठ अधिकारी गौतम इंगवले यांनी उपस्थित जवानांना विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. यासोबतच मॉक ड्रिलचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. आगीचे प्रकार, त्वरित रिस्पॉन्स, रेस्क्यू अशा गोष्टींचे प्रशिक्षण यावेळी जवानांनी घेतले.
अग्निशमन विभागाकडे असलेल्या संसाधनांची माहिती सुद्धा जवानांना देण्यात आली. विभागातील गाड्या कशा पद्धतीने कार्य करतात, त्यांच्या उपयोग कशा प्रकारे केला जातो, त्याच प्रमाणे फायर सूट, होज रील पाइप अशा इतर साधनांची ही ओळख जवानांना करून देण्यात आली. संरक्षण दलाच्या देहूरोड संस्थांनामार्फत या कमांड फायर फायटिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
....
देशाच्या रक्षणासाठी सैन्य आणि अग्निशमन विभागाचे जवान नेहमीच कार्यरत असतात. सैन्य देशाच्या शत्रूला रोखते आणि अग्निशमन विभाग आपत्कालीन परिस्थिती सांभाळते. अग्निशमन विभागाच्या कार्याचे स्वरूप, त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी जवानांनी विभागाला दिलेली भेट अतिशय महत्वाची आहे. दोन्ही विभागांची कार्यप्रणाली वेगवेगळी असली तरी देशसेवेचा उद्देश मात्र एकच आहे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
.....
अग्निशमन विभागची कार्यपद्धतीने जाणून घेण्यासाठी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी संरक्षण दलाच्या जवानांनी अग्निशमन विभागाला दिलेली ही प्रत्यक्ष भेट महत्वपूर्ण आहे. जवानांना कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अग्निशमन विभागासोबत त्यांनी घेतलेले प्रशिक्षण हे त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
- व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
.....
अग्निशमन विभागाचे जवान आणि भारतीय सैन्याचे जवान हे अनेक संकटांना सामोरे जातात. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे जवान नेहमीच सिद्ध असतात. अतिशय उत्साही वातावरणात हे प्रशिक्षण सत्र पार पडले. जवानांनी अतिशय काळजीपूर्वक सर्व माहिती जाणून घेतली. अशा पद्धतीचे प्रशिक्षण सत्र वारंवार होत रहावेत, यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करू.
- ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

0 Comments