मुंबई :- उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून तीन दिवसांत थंडीची लाट राज्यात दाखल होईल. साधारणपणे 12 ते 13 डिसेंबरदरम्यान राज्यात थंडीची लाट सक्रिय होत पारा दहा अंशांखाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात पाऊस सुरू होत आहे. असे परस्पर विरोधी वातावरण राज्यात तयार होत आहे. उत्तरेत जम्मू कश्मीर, लद्दाख, गिलगिट, मुजफ्फराबाद, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असून मंगळवारी या भागात थंडीची मोठी लाट सक्रिय होत आहे. त्यामळे मध्य भारतात 10 ते 13 डिसेंबर या कालावधीत दाट धुके अन् कडाक्याची थंडी सुरू होत आहे.
अशी येत आहे थंडी..
समुद्र सपाटीपासून साडेबारा कि.मी. उंचीपासून ते साडेचार कि.मी. उंचीवरून खाली (व्हर्टिकली डाऊन) शीत लहरी टप्प्या-टप्प्याने खाली येत आहेत. वेगवान पश्चिमी अतिशीत कोरडे वारे (जेट स्ट्रीम) उत्तर भारताकडून दक्षिणेकडे (समांतर) म्हणजे 37 अंश उत्तरेपासून ते 19अंश अक्षवृत्तापर्यंत रुंदावल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, पुणे या शहरांंत पहाटे 5 वाजताच्या किमान तापमानात वेगाने घट होत आहे. सोमवारी 9 डिसेंबर रोजी पहाटे या तीन शहरांतील तापमान 9 ते 14 अंश सेल्सिअसदरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी खाली आले होते.
पाकिस्तानकडून वायव्य दिशेने पश्चिमी चक्रवात भारतात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरडे थंड वारे (बाष्प नसलेले) वाहत आहे. या दोन वार्यांचा एकत्रित परिणाम होऊन नाशिककडून थंडी पडण्यास सुरुवात झाली असून पुढील दहा दिवस तिचा मुक्काम राहील, म्हणजे बुधवारी 18 डिसेंबर राज्यात कडाक्याची थंडी राहणार आहे, असे डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्याचे मंगळवारचे किमान तापमान..
नाशिक 12.5, मुंबई (कुलाबा) 20.9, सांताक्रूझ 17.2, रत्नागिरी 21.4, पुणे 16.4, अहिल्यानगर 15.5, कोल्हापूर 21.8, महाबळेश्वर 15.7, मालेगाव 18, नाशिक 12.5, सांगली 21.5, सातारा 18, सोलापूर 22.1, छ. संभाजीनगर 16, बीड 18.5, अकोला 17, अमरावती 18.9, बुलढाणा 17, ब्रम्हपुरी 19.1, चंद्रपूर 16.8, गोंदिया 19.6, नागपूर 19.2, वाशिम 19.2, वर्धा 20.2
नाशिक, पुणे, मुंबईत पहाटे थंडीला सुरुवात
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे तापमान खाली येण्यास सुरुवात झाली असूनष मुंबईच्या कुलाबा व सांताक्रुझ येथील वेधशाळेत सोमवारी पहाटे 9 व 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नाशिक, पुणे व मुंबई येथील पहाटेच्या तापमानात खूप मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे.

0 Comments