थेरगाव, दि. १८ नोव्हेंबर २०२४- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनामध्ये दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली विविध निवडणूक प्रक्रिया राबविल्या जात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तसेच मतदान साहित्य वितरण व स्विकृतीसाठी सूक्ष्म नियोजन देखील करण्यात आले आहे. केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहने आणि इतर व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून ५६४ मतदान केंद्रे आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी १३५३ बॅलेट युनिट, ६७६ कंट्रोल युनिट आणि ७३३ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ५६४ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २२५ बॅलेट युनिट, ११२ कंट्रोल युनिट आणि १६९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.
दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी करावयाचे कामकाज तसेच मतदान साहित्याबाबत काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाईल. साहित्य वितरणाच्या ठिकाणी साहित्य वाटपासाठी मतदान केंद्रनिहाय टेबल तयार करण्यात आले आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येईल. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेतली जाईल. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात येतील. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी स्वतंत्र कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी ११५ पीएमपीएमल बसेस, ११ मिनी बसेस तसेच २५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून जीपीएस प्रणालीदेखील बसवली जाणार आहे.
प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्याकामी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करावी, नियोजित मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्य वितरण करताना योग्य समन्वय ठेवून मतदान साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर सुस्थितीत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, तसेच निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम पार पाडावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहेत.

0 Comments