Hot Posts

6/recent/ticker-posts

रांगोळी, रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी सांगवीकरांना पटवून दिले मतदानाचे महत्व

 

         थेरगाव, दि. १३ नोव्हेंबर २०२४ - ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशी घोषवाक्य लिहून त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसेच ढोल ताशांच्या गजरात हातात मतदान जनजागृती घोषवाक्यांचे बॅनर घेऊन आणि ‘जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकारी आहे’ अशा विविध घोषणा देत रॅलीच्या माध्यमातून बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीमधील मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले. 

        चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा भोसले, स्वीप टीम समन्वय अधिकारी राजीव घुले, प्रिन्स सिंह, गणेश लिंगडे, दिपक एन्नावार, मनोज माचरे, विजय वाघमारे, लोखंडे तसेच बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शिक्षक सुजाता चासकर, संध्या काळे,प्रिती भुयार, संदीप हिंगणे, विजय आगळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

        मतदान जनजागृती कार्यक्रमावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुकही केले आणि त्यांना आणखी प्रोत्साहित केले. याव्यतिरिक्त, विद्यार्थी, शिक्षक आणि स्वीप टीमच्या सहभागातून भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात आपले मत, आपली ताकद.., आपले मत, आपला हक्क.., उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा.., चला मंडळी मतदानाला जाऊया अशी घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले.

        २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या स्वीप टीमच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व नातेवाईकांपर्यंत लोकशाहीला आणखी बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे. यामध्ये शाळा तसेच मतदान टक्केवारी कमी असलेल्या परिसरांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 


Post a Comment

0 Comments