थेरगाव, १९ नोव्हेंबर २०२४- चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांची दैनंदिन तिसरी खर्च तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत तसेच खर्च तपासणी समन्वयक अश्विनी मुसळे, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक पवन यादव, रमेश फडतरे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ खर्च तपासणी कक्ष प्रमुख शिवाजी ठोंबरे यांच्या अधिपत्याखाली थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात पार पडली .
भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील मार्गदर्शक सूचनेनुसार उमेदवारांनी केलेली दैनंदिन खर्चाची तपासणी तीन टप्यात करण्याबाबत तरतूद आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी विहीत मुदतीत पार पडली.
तिसऱ्या खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २१ उमेदवारांपैकी २० उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला असून विनायक सोपान ओव्हाळ (अपक्ष) उमेदवाराने तीनही वेळा झालेल्या खर्च तपासणीवेळी निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी नोटीस बजावली आहे.
ज्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळली त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. राजेंद्र कुंडलिक गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आणि जावेद रशीद शेख या उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली आहे. अनिल बाबू सोनवणे (अपक्ष)या उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचे बँक खाते व रोकड खाते यात तफावत आढळली आहे. तसेच मारुती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) आणि रुपेश रमेश शिंदे (अपक्ष)या उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत प्रसारमाध्यमांवर जाहिरात प्रसिद्ध केली नाही. या सर्व उमेदवारांना देखील नोटीस बजावली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून प्रेम प्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २१ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम,१९५१ कलम ७८ अन्वये रिंगणात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत निवडणुकीबाबतचा हिशोब निवडणूक आयोगास सादर करणे आवश्यक आहे.

0 Comments