थेरगाव, दि. १९ नोव्हेंबर २०२४- बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी चिंचवड मतदारसंघात होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात १०१ ठिकाणांवर एकूण ५६४ मतदान केंद्रे असून ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. या मतदारांमध्ये ३ लाख ३८ हजार ४५० पुरूष मतदार, ३ लाख १५ हजार ११५ महिला मतदार तर ५७ इतर मतदार आहेत.
दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी विविध सुविधा -
मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून दिव्यांग मतदारांसाठीही आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता घरून मतदानाच्या ठिकाणी व पुन्हा त्यांच्या घरी सोडणेकामी ३० रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांचा आढावा घेऊन मतदान केंद्रांच्या नजीकच्या मध्यवर्ती ठिकाणी या रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण १०४ मतदान केंद्रांच्या ठिकाणी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी २०४ व्हीलचेअर्स ने-आण करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक मतदान केद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्याने व्हीलचेअर्स फिरेल अशा पद्धतीने टेबलची मांडणी करण्यात आली आहे. तसेच आज मतदान केंद्रांवर ठेवण्यासाठी व्हीलचेअर्स सेक्टर ऑफिसर यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती स्लीप वाटप करण्यात आल्या आहेत. तसेच अंध मतदारांकरिता ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका प्रत्येक केंद्रावर माहिती घेण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. तसेच कमी दिसणाऱ्या अंध व्यक्तींसाठी आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांवर भिंग (मॅग्नीफाईंग ग्लास) पुरविण्यात आलेले आहेत. ईव्हीएम मशीनवर देखील ब्रेलमध्ये क्रमांक छापलेले असणार आहेत जेणेकरून ब्रेल लिपीतील मतपत्रिका वाचून त्यावरील क्रमांक लक्षात ठेऊन अंध व्यक्ती स्वत:चे मत देऊ शकतील. तसेच त्यांना मतदान करताना बरोबर एक अठरा वर्षांवरील व्यक्तीस सोबत आणता येणार आहे. सक्षम ऍपद्वारे नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना त्यांच्या मागणीनुसार मतदानाच्या दिवशी आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कर्णबधिर दिव्यांग मतदारांकरीता साईन लँग्वेजमध्ये मतपत्रिका समजून घेण्यासाठी इंटरप्रिटरची नेमणूक करणेत आलेली आहे. ज्या ठिकाणी कर्णबधीर मतदाराला मतदान करताना अडचण येईल अशा ठिकाणी तात्काळ इंटरप्रिटर ची व्यवस्था करणेत आलेली आहे. दिव्यांगाकरीता मतदान सुविधेबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे येथे हेल्पलाईन क्र. ९२२६३६३००२ देखील सुरू करण्यात आला आहे. याबाबत २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात राहणा-या कर्णबधिर नागरीकांच्या बैठका घेवून त्यांना मतदान प्रक्रिया व हेल्पलाईनची माहिती देण्यात आलेली आहे.
मतदान केंद्रावर विविध सुविधा-
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अनिल पवार यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज-
भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे पोलीस गस्त, पोलीस पथ संचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून त्याद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.
कंट्रोल रुमद्वारे लक्ष ठेवणार-
मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
मॉडेल मतदान केंद्रे -
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५ विविध प्रकारची विशेष मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये मॉडेल मतदान केंद्र (PS.४४), युथ मतदान केंद्र (PS.४९९), महिला मतदान केंद्र (PS.१४७), दिव्यांग मतदान केंद्र (PS.६६) व युनिक मतदान केंद्र (PS.३५८) असे आहेत. या मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्सची देखील व्यवस्था केलेली आहे.
मतदार माहिती चिट्ठी तसेच मतदार मार्गदर्शिकांचे वाटप-
चिंचवड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण ६ लाख २६ हजार २९४ मतदार माहिती चिट्ठ्यांचे वाटप करण्यात आले असून १ लाख ७० हजार मतदार मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात आले आहे. या वाटपासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
मतदान प्रमाणपत्र -
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केल्याबद्दल मतदाराला प्रमाणपत्र देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून क्युआर कोड स्कॅनर उपलब्ध करून दिलेले असून क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदाराला आपला मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करता येईल. तसेच फॉर्म अचूक भरलेनंतर ई-मेल वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.

0 Comments