पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ३ मार्च २०२६ : महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहत होळी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. दरम्यान पुण्यात होळीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. कोरेगाव पार्क मुंढवा रोडवर एका होळीच्या कार्यक्रमात लाईटचे गर्डर पडून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
यातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, होळी निमित्त कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये एका भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी एक हजार पेक्षा जास्त तरुण तरुणींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात अचानक लाइटचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली आहे. गर्डर काही तरुणांच्या अंगावर पडल्यानं १५ ते १६ जण जखमी झाले आहेत. यात तरुण तरुणींचा समावेश आहे.
गर्डर पडून जखमी झालेल्यां पैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर येतेय. दरम्यान, या कार्यक्रमाला परवानगी होती का? तरुण तरुणी दारुच्या नशेत असल्याचंही म्हटलं जातंय.
याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एका खासगी इव्हेंट कंपनीला परवानगी मिळाली होती. मात्र या कार्यक्रमात मद्यपानाची परवानगी दिली गेली नव्हती असं सांगण्यात येतंय. कार्यक्रमात दारू पिऊन आलेल्या तरुणांमुळे दुर्घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रम बंद करून तरुण तरुणींना तिथून बाहेर काढलं आहे.

0 Comments