पुणे; दि.०४ (शशिकांत पाटोळे) : कात्रज त्रिमूर्ति चौक ते निलगिरी चौक या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याचा थेट फटका सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना व नोकरदारांना बसत आहे. या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ओव्हरलोड जड वाहने, RMC मिक्सर, १० टायर ट्रक, डंपर आदी वाहनांची अनियंत्रित वाहतूक असल्याचे समोर आले आहे.
यासोबतच अवधूत कॉम्प्लेक्स समोरील सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील व लोखंडी प्लेट्स रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले असून RMC मिक्सर थेट रस्त्यावर उभे करून काँक्रिट मिक्सिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
कात्रज ते नवले ब्रिज या दरम्यान सर्विस रोडवर असलेल्या भुयारी मार्गांतून जड वाहने, RMC मिक्सर, डंपर, JCB, रोड रोलर यांची वाहतूक सातत्याने सुरू असून अनेक वेळा ही वाहने भुयारी मार्गात अडकत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे. नुकतेच सिंहगड कॉलेज समोरील भुयारी मार्गात RMC मिक्सर अडकल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे पुणे शहरातील नन्हे परिसरातील भुमकर चौक भुयारी मार्ग तसेच ताथवडे येथील भुयारी मार्ग जड वाहनांसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. मात्र असे असतानाही कात्रज ते नवले ब्रिज परिसरातील भुयारी मार्गांतून अद्याप जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सौ. प्रतिभा रोहिदास चोरघे व श्री. रोहिदास अनंता चोरघे यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कात्रज यांच्याकडे लेखी निवेदन देत त्रिमूर्ति चौक ते निलगिरी चौक दरम्यान रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांवर तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या RMC मिक्सर, ट्रक, डंपर यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच रस्त्याच्या कडेला टाकलेले स्टील, प्लेट्स व बांधकाम साहित्य त्वरित हटविण्यात यावे आणि कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या सर्व भुयारी मार्गांतून उंच व जड वाहने, ओव्हरलोड ट्रक, डंपर, RMC मिक्सर, JCB, रोड रोलर यांना कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
वेळीच कारवाई न झाल्यास वाहतूक कोंडीसह मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments