पुणे; (शशिकांत पाटोळे) : धारदार हत्यारांनी दोघांवर जीवघेणा हल्ला करून वडगाव बुद्रूक परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीतील चौघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वडगाव बुद्रूक परिसरात चार फेब्रुवारी रोजी एका टोळक्याने मोटारीची काच फोडून दोघांवर हत्यारांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी तपासाबाबत सूचना दिल्या.त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांच्या तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
त्यावरून आरोपींची ओळख पटवून अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. दांडेकर पूल), निशांत राजेश राऊत (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर), सुमीत अनिल माने (वय २२, रा. हडपसर) आणि स्वप्नील चंद्रकांत गायकवाड (वय २०, रा. बिबवेवाडी) या चौघांना अटक करण्यात आली.

0 Comments