Hot Posts

6/recent/ticker-posts

सायकल स्पर्धेसाठी चकाचक केलेले रस्ते महिन्याभरात खचले.


          पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २४ फेब्रुवारी २०२६ : पुणे महापालिकेने आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तब्बल १४५ कोटी रुपये खर्च करून रस्ते डांबरीकरण, चेंबर समपातळीत आणण्याचे काम केले, पण आता एक महिना पूर्ण होत असतानाच चेंबर खचायला सुरुवात झाली आहे.

       त्यामुळे एवढा मोठा खर्च करून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पुन्हा दुरुस्तीची नामुष्की ओढवली आहे. महापालिका प्रशासन हे चेंबर पुन्हा दुरुस्त करणार असले तरी ठेकेदाराच्या चौकशीला मात्र टाळाटाळ केली जात आहे.

       पुण्यात जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा झाली. या स्पर्धेला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी महापालिकेने ७५ किलोमीटरचे रस्ते चकाचक केले. रस्त्यातील ओबडधोबड पॅचवर्क गायब झाले, रस्त्यांवर पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, रंगवलेले पादचारी मार्ग आणि दुभाजकांमुळे रस्ते सुंदर झाले. प्रवासातील त्रास दूर झाल्याने पुणेकरांनी महापालिकेच्या या कामाचे कौतुक केले.

       महापालिकेने ७५ किलोमीटरच्या कामासाठी तब्बल १४५ कोटी रुपये मोजले आहेत, मात्र सायकल स्पर्धेसाठी हे काम अतिशय महत्त्वाचे असल्याने व काम दर्जेदार झाले पाहिजे असा आग्रह असल्याने त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत, तसेच अत्यावश्यक कामे म्हणून महापालिकेने विनानिविदा सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांवरील चेंबर उचलण्याची कामे केली.

       महापालिकेने केलेले रस्ते आणि चेंबर खराब होणार नाहीत. उलट पुढच्या वर्षभरात शहरातील अन्य रस्ते व सुमारे १५०० चेंबर दुरुस्त केले जाणार आहेत, असा दावा केला आहे. याप्रकरणी दीपक वाघमारे, विवेक वेलणकर यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून, सायकल स्पर्धेनिमित्त केलेली चेंबर दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला आहे, तसेच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

       सायकल स्पर्धा मार्गावरील चेंबर खचल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले आहे. ते पुन्हा त्याच ठेकेदाराकडून दुरुस्त केले जातील. ही जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे, तसेच भविष्यात १५०० चेंबर दुरुस्त केले जाणार आहेत. त्यावेळीही काळजी घेतली जाईल. चेंबर खराब झाल्याची चौकशी करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments