Hot Posts

6/recent/ticker-posts

भारताची चित्तथरारक भरारी! ‘अग्नी-३’ची यशस्वी चाचणी; ५ किमी प्रति सेकंद वेग..

       पुणे; दि.०७ (शशिकांत पाटोळे) : भारताने आपल्या संरक्षण सज्जतेचे दर्शन घडवत ‘अग्नी-३’ या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइलची (IRBM) यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) ६ फेब्रुवारी रोजी हे प्रक्षेपण करण्यात आले. एका सेकंदात ५ किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे आशिया खंडातील सामरिक संतुलन भारताच्या बाजूने झुकले असून, शेजारील शत्रू राष्ट्रांची झोप उडाली आहे.

      संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) या चाचणीच्या यशाला दुजोरा दिला आहे. भारतीय लष्कराच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या (SFC) देखरेखीखाली ही चाचणी पार पडली. क्षेपणास्त्राने आपले सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक निकष अत्यंत अचूकपणे पूर्ण केले. भारताची ‘परमाणु त्रयी’ (Nuclear Triad) म्हणजेच जमीन, हवा आणि समुद्रातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता या यशस्वी चाचणीमुळे अधिक पोलादी झाली आहे.

• अग्नी-३’ची विद्ध्वंसक वैशिष्ट्ये –

हे क्षेपणास्त्र केवळ वेगवानच नाही, तर अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

वेग : मॅक १५ (ताशी सुमारे १८,५०० किमी), म्हणजेच एका सेकंदात ५ ते ६ किमी अंतर कापण्याची अफाट शक्ती.

पल्ला : ३००० ते ३५०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा (गरज पडल्यास पल्ला वाढवण्याची क्षमता).

वजन आणि आकार : सुमारे ४८-५० टन वजन आणि १७ मीटर लांबी.

-: पेलोड : १.५ टनांपर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम.

• अचूकता : ‘रिंग लेझर जायरोस्कोप’ नेव्हिगेशन प्रणालीमुळे लक्ष्याचा अचूक वेध.

     विशेष तंत्रज्ञान : उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची MIRV तंत्रज्ञानाची जोड.

-: अग्नी मालिका: भारताचे ‘ब्रह्मास्त्र’

• भारताच्या संरक्षण दलात अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रे कणा मानली जातात.

अग्नी-१ : ७०० किमी पल्ला

अग्नी-२ : २००० किमी पल्ला

अग्नी-३ : ३०००-३५०० किमी पल्ला

अग्नी-४ : ४००० किमी पल्ला

अग्नी-५ : ५०००+ किमी (आंतरखंडीय क्षेपणास्त्र)

• चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा –

       अग्नी-३ च्या पल्ल्यात संपूर्ण पाकिस्तान आणि चीनचा बहुतांश भूभाग येतो. तज्ज्ञांच्या मते, भारताने ही चाचणी करून आपल्या शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की, भारताच्या सीमांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील. प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने भारताचे हे ‘डिटरन्स’ (प्रतिबंधात्मक शक्ती) अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments