Hot Posts

6/recent/ticker-posts

चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे प्रवाशांची दिशाभूल..

         पुणे; दि.०७ (शशिकांत पाटोळे) : कापूरहोळ–भोर–मांढरदेवी–वाई मार्गावर प्रशासनाचे दुर्लक्ष; यात्राकाळात वाहनचालकांचा खोळंबाकापूरहोळ–भोर–मांढरदेवी–वाई या सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा मार्ग पुण्याकडून वाई व महाबळेश्वरकडे जाण्यासाठी एक महत्त्वाचा व जवळचा पर्याय ठरत आहे.

        परिणामी या मार्गावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर लावण्यात आलेल्या चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

        सध्या मांढरदेवी काळूबाईची यात्रा तसेच भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील विविध यात्रांमुळे या मार्गावर भाविक, प्रवासी आणि नवख्या वाहनचालकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अशा परिस्थितीत चुकीच्या दिशेची माहिती देणारे फलक प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत असून, अनेक वाहनचालकांचा प्रवास भरकटत आहे.

       यामुळे त्यांना वेळेचा अपव्यय, अतिरिक्त इंधन खर्च, शारीरिक श्रम आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.नेरे (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत, गिरिराज हॉटेलच्या शेजारी मांढरदेवी–भोर रस्त्याच्या कडेला ‘पुणे–भोर–सातारा’ असा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे.

        विशेष म्हणजे या फलकावर सर्व ठिकाणांसाठी बाणांची दिशा उत्तरेकडे दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात संबंधित ठिकाणच्या दक्षिण दिशेला सातारा तर उत्तरेस भोर व पुणे आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

      इतकेच नव्हे तर या संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी अशाच प्रकारे चुकीची माहिती असलेले दिशादर्शक फलक लावले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने फलक बसविल्यामुळे अनेकदा वाहनचालक रस्ता चुकत असून, पुन्हा वळण घेण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागत आहे.

      या पार्श्वभूमीवर, दिशादर्शक फलकांवरील चुकीची माहिती तातडीने दुरुस्त करून योग्य दिशा दर्शविणारे फलक लावावेत, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक व प्रवासी करीत आहेत. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास यात्राकाळात अपघातांची शक्यताही नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments