पिंपरी (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६ भोसरी एमआयडीसी परिसरातील खंडेवस्ती येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास बुद्ध विहारासमोर घडली.
याप्रकरणी परस्पराविरोधात गुन्हे दाखल केले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात रघुनाथ जिंबक आव्हाड (५२, खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल उर्फ काळ्या रमेश प्रसाद (२४, खंडेवस्ती, भोसरी) याला अटक केली आहे. त्याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यातील अल्पवयीन असलेल्या तिघांना समजपत्र देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांना घेराव घातला आणि “तुझे या भागात अति चालले आहे, तुला आता ठार करतो” असे म्हणून लोखंडी पट्टीने डोक्यात वार केले. फिर्यादीचा आवाज ऐकून त्यांचे नातेवाईक वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी पट्टीने मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले असून राहुल उर्फ काळ्या याला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलांना समजपत्र देण्यात आले आहे.
याच्या परस्पर विरोधात सोनु बाबुलाल गौतम (१७, खंडेवस्ती, भोसरी) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रघुनाथ त्रिंबक आव्हाड (५०, खंडेवस्ती, भोसरी), समाधान दुधभाते (२५, खंडेवस्ती, भोसरी), ओमकार दुधभाते (२२, खंडेवस्ती, भोसरी), अविनाश दत्ता काकडे (२०, खंडेवस्ती, भोसरी) आणि एक महिला (४५, खंडेवस्ती, भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या मित्राला जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर “तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारले, तर महिला आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

0 Comments