पुणे; दि. ०६ (शशिकांत पाटोळे) : लवळे (ता. मुळशी) येथील पीएम श्री प्राथमिक शाळेने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक स्तुत्य आणि अनुकरणीय पाऊल उचलले आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या व डब्यांचा वापर पूर्णतः बंद करून त्याऐवजी स्टीलच्या डब्या व बाटल्यांचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशांतून राबविल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.हा उपक्रम छोटा असला तरी पर्यावरण संरक्षण, आरोग्य जपणूक आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रभावी संदेश देणारा ठरला आहे.
प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये योग्य सवयी रुजविण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे.‘टाळूनी प्लास्टिक, करूनी स्टील’ ही संकल्पना ठरली प्रेरणादायीमुख्याध्यापिका नंदा खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहावीच्या वर्गशिक्षिका शुभांगी निघोट यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. 'टाळूनी प्लास्टिक, करूनी स्टील डबा व बाटलीचा वापर, करू आरोग्याचा जागर’ ही संकल्पना राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.या उपक्रमानंतर सहावीतील तब्बल ४० विद्यार्थ्यांनी स्टीलच्या बाटल्या व डब्यांचा वापर सुरू केला आहे.
दररोज शाळेत येताना प्लॅस्टिकऐवजी स्टील साहित्य वापरण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.आरोग्य आणि पर्यावरणाविषयी दिले मार्गदर्शनया उपक्रमाच्या निमित्ताने शुभांगी निघोट यांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून स्टीलचे डबे व बाटल्या अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि आरोग्यदायी असल्याचे त्यांनी समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना खाऊच्या पैशांतूनच स्टीलचा डबा व बाटली खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यासोबतच पालकांनाही या उपक्रमाची माहिती देत त्यांच्यातही जागृती करण्यात आली.लहान पावलांतून मोठा संदेशशाळेतील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना, आरोग्याविषयी जागरूकता आणि स्वावलंबन निर्माण होत आहे. लवळे शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, ‘प्लॅस्टिकमुक्त शाळा’ या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

0 Comments