
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)-: दि.१०,आज सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी पिंपरी–चिंचवड येथे आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले. प्रा. जाधव यांनी सांगितले की, पिंपरी–चिंचवड शहरातील धुळीचे कण मायक्रो लेव्हलवर अत्यंत वाढले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या प्रदूषणामुळे प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अंदाजे २० वर्षांनी कमी होत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
शहरातील नद्यांमध्ये वाढणारे जलपर्णी, तसेच अनेक कंपन्यांकडून नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी ही प्रदूषणाची गंभीर कारणे असून, बिल्डरांच्या बांधकामांमधून निर्माण होणारी प्रचंड धूळ ही परिस्थिती आणखी बिघडवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि राजकीय नेते बिल्डरांशी संगनमत करून बसले असल्याने शहरातील आवश्यक सुधारणा होणे कठीण झाले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर सनय छत्रपती शासन पक्ष पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या एकूण १२८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
काही पक्षांचे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षांकडून तिकीट न मिळाल्यास ते आमच्या पक्षातून लढण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आमचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. निवडून आलेला कोणताही उमेदवार भ्रष्टाचारात गुंतला तर त्याचे नगरसेवकपद मी पक्षाध्यक्ष म्हणून तत्काळ रद्द करीन,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.शहरातील नागरिकांना आता तेच-तेच चेहरे आणि तेच-तेच पक्ष नको आहेत. आमचे कार्य नागरिकांपर्यंत व्हिडिओद्वारे स्पष्टपणे पोचत असल्याने त्यांचा विश्वास आणि मतांचा कौल आमच्याकडे वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही पिंपरी–चिंचवडमधील सनय छत्रपती शासन पक्षाची पहिली पत्रकार परिषद असल्याची त्यांनी माहिती दिली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राजकारणात घराणेशाही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या पक्षांत जात आहेत. यामुळे नवीन तरुणांना संधी मिळत नाही.
त्याचबरोबर, राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे अल्पशिक्षित आणि गुंड प्रवृत्तीचे लोक निवडून येतात, तर सुशिक्षित मतदार मतदानाला बाहेर पडत नाहीत. यामुळे एकूण मतदान केवळ ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान राहते.
या परिस्थितीला बदलण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्ष सर्वत्र सुशिक्षित आणि उच्चशिक्षित उमेदवारांना तिकीट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. असा निर्णय घेतल्यास जे सुशिक्षित मतदार आजपर्यंत मतदानासाठी बाहेर पडत नव्हते, ते मोठ्या संख्येने मतदानाला येतील, आणि यामुळे घराणेशाही व गुंडगिरी यांना पूर्णविराम मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच पिंपरी–चिंचवडमध्ये विक्रमी मतदान होईल, आणि या विक्रमी मतदानातून सत्तांतर घडेल, असे ते म्हणाले. या शहरातील प्रत्येक नागरिकाला आपले शहर सिंगापूरसारखे विकसित व्हावे अशी इच्छा असून, हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता सनय छत्रपती शासन पक्षाच्या दूरदृष्टीतून शक्य आहे, असे ते म्हणाले.
• प्रा. जाधव यांनी सांगितले की,
सनय छत्रपती शासन पक्षाचा जन्म पिंपरी–चिंचवडमध्येच झाला असून, पक्षाध्यक्ष म्हणून ते स्वतः या शहरात राहत असल्याने शहरातील सर्व समस्यांची त्यांना पूर्ण जाण आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रश्न शंभर टक्के सकारात्मकपणे सोडवले जातील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
0 Comments