• संगीत प्रवचनातून उलगडणार लोकशाहीचे अनोखे नाते..
चिंचवड (प्रतिनिधी)-: संविधान दिनानिमित्त चिंचवडमधील विविध सामाजिक संघटनांनी एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘संत, स्वराज्य आणि संविधान’ या शीर्षकाखाली होणाऱ्या या अनोख्या संगीत प्रवचनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, संत परंपरा आणि भारतीय संविधानातील साम्य, तत्त्वज्ञान व मूल्यांचा सुंदर संगम रसिकांसमोर मांडला जाणार आहे.
हा कार्यक्रम ३० नोव्हेंबर २०२५ रोजी, रविवारी दुपारी साडे तीन वाजता चैतन्य सभागृह, बिजलीनगर रोड, चिचवड येथे होणार आहे. संविधानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, बारा बलुतेदार महासंघ, संविधान सन्मान मंच, संविधान जागर अभियान आणि इतर पुरोगामी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमात संतांच्या शिकवणींनी घडवलेला सामाजिक विचार, शिवछत्रपतींच्या लोकाभिमुख राज्यकारभारातील लोकशाहीचे बीज आणि स्वातंत्र्यानंतर संविधानातून घडलेली आधुनिक लोकशाही व्यवस्था – यामधील नाते संगीत आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर होईल. भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्यांची आजच्या समाजातील उपयुक्तता आणि नागरिकांनी पाळायच्या कर्तव्यांवरही मननीय प्रकाश टाकला जाणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान, स्वराज्य आणि संत परंपरेची मूल्ये जाणून घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजक सतीश काळे आणि श्रीकृष्ण यांनी केले.


0 Comments