Hot Posts

6/recent/ticker-posts

पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या; अनैतिक संबंधाच्या आरोपांमुळे प्रकरणात गुन्हा दाखल-कुटुंबीयांचे हत्येचे संशय !


       मुंबई प्रतिनिधी. राज्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी परिसरात समोर आली आहे. डॉक्टर गौरी गर्जे-पालवे (पत्नी) यांनी जीवन संपवल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

      अनंत गर्जे आणि गौरी यांचा या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. मात्र अवघ्या दहा महिन्यांत संसारात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत असून, अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पुढे आला आहे.     

       दरम्यान, गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ॲक्शन मोडवर आल्या असून त्यांनी वरळी पोलिसांशी भेट घेऊन चर्चा केली. पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

      वरळी पोलिसांनी गौरी गर्जे-पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे व दीर अजय गर्जे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

      या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, अशी भूमिका अंजली दमानिया यांनी स्पष्ट केली आहे. तर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तो माझा पीए असला तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

      आत्महत्येचा निर्णय, कुटुंबीयांचे आरोप आणि नोंदवलेला गुन्हा यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments