पुणे : मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीला आपल्या प्रभावी अभिनयाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असून, त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमिसह सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. संवेदनशील आणि वास्तवदर्शी भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली होती. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘लेकुरे उदंड जाली’ यासारख्या अनेक लोकप्रिय नाटकांतून दया डोंगरे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
• वयाच्या 16 व्या वर्षी केलं रंगभूमीवर पदार्पण..
दया डोंगरे यांचा जन्म 11 मार्च 1940 रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला होता. बालपणापासूनच त्यांना कलाक्षेत्राची आवड होती. बालपणातील काही वर्षे त्यांनी कर्नाटकातील धारवाड येथे घालवली. संगीत क्षेत्रात त्यांचा कल अधिक होता आणि त्यांनी आकाशवाणीच्या गायन स्पर्धेत यश मिळवत आपली ओळख निर्माण केली. मात्र, नंतर अभिनयाची ओढ अधिक भासल्याने त्यांनी रंगभूमीकडे वळण घेतलं. त्यांच्या आई यमुताई मोडक या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. अभिनयाचं हे बाळकडूच त्यांना पुढे मार्गदर्शक ठरलं. केवळ 16 व्या वर्षी त्यांनी मो. ग. रांगणेकर लिखित ‘रंभा’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं आणि पहिल्याच भूमिकेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
• चित्रपट आणि दूरदर्शनमधील अविस्मरणीय भूमिका..
रंगभूमीवर आपली छाप सोडल्यानंतर दया डोंगरे यांनी दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतही आपली प्रतिभा खुलवली. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’ यासारख्या नाटकांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तर चित्रपटांत त्यांनी ‘मायबाप’, ‘आत्मविश्वास’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवी मिळे नवऱ्याला’, आणि ‘उंबरठा’ या चित्रपटांमधील भूमिकांमधून आपला प्रभावी ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयात वास्तववाद, संवेदनशीलता आणि मातृत्वाचा गहिरा स्पर्श नेहमी जाणवायचा.
• गौरव आणि सन्मान...
दया डोंगरे यांच्या दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीला महाराष्ट्र शासनाने विशेष अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच 2019 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कलायात्रेचा गौरव करण्यात आला होता.
• एक संवेदनशील कलावंताचा निरोप..
दया डोंगरे यांनी संगीत, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला. त्यांचा अभिनय म्हणजे भावनांचा सच्चा प्रवाह होता. त्यांची विनम्रता, साधेपणा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा यामुळे त्या प्रत्येक सहकाऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या मनात घर करून राहिल्या. आज त्या आपल्या अभिनयाने कायमच्या स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाने एक संवेदनशील, आत्मीय आणि मनस्वी कलाकार गमावला आहे.


0 Comments