: मुख्य प्रशासकीय इमारत येथील प्रतिमेस तसेच सांगवी व मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास महापालिकेच्या वतीने अभिवादन....
पिंपरी, ३१ मे २०२५ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या युध्दनितीनिपुण,उत्कृष्ट प्रशासिका,मुत्सद्दी आणि जनहिताच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, त्यांनी आपल्या कारकीर्दीत जनकल्याण, न्यायव्यवस्था आणि विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या याच लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु असल्याचे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगर सदस्य शत्रुघ्न काटे, राजू दुर्गे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर, सोनाबाई गडदे, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, पोपट हजारे, विठ्ठल देवमाने, विजय भोजने, दीपक भोजने, गणेश भांडवलकर, ज्ञानेश्वर गोजावले, आदी उपस्थित होते.
तसेच पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त सचिन पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, मच्छिंद्र चिंचोले, शिवाजीराव खडसे, मनोज मोरे, संजय कांबळे, रघुनाथ मलिशे, यशराज चिंचोले तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
तर सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगर सदस्य प्रशांत शितोळे, सागर अंघोळकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
—--------- • ‘पुण्यश्लोक’ उपाधी मिळविणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी एकमेव
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या खास शैलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्रावर व्याख्यान सादर केले. यामध्ये अहिल्यादेवी यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अत्यंत समर्पक शब्दात उपस्थित नागरिकांना समजावून सांगितला. अहिल्यादेवी होळकर या केवळ एक कुशल प्रशासिका नव्हत्या, तर त्या एक न्यायनितीनिपुण आदर्श स्त्रीशक्तीचे प्रतीकही होत्या. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे पालन करत अनेक धाडसी निर्णय घेतले, घाट दुरुस्ती, धर्मशाळा, विहिरी यांची निर्मिती केली, कलाकारांना राजाश्रय दिला तसेच धार्मिक स्थळांचे पुनरुत्थान केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक वृक्षांची लागवड केली, शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. युद्धकलेत देखील त्या निपुण असल्यामुळे त्यांनी राज्यात सक्षम संरक्षण व्यवस्था तयार केलेली होती. त्यांचा इतिहास हा अद्वितीय असून तो सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनांच पुण्यश्लोक का म्हणतात या मागील इतिहास देखील त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. यावेळी नागरिकांनी देखील त्यांना भरभरून साद दिली.

0 Comments