पुणे-: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे.
विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. आज पीडित भिसे कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भिसे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज भिसे कुटुंबीयांनी माझी भेट घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. मी तयार केलेली कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मी या प्रकरणात सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “भविष्यात पुन्हा असे प्रकरण घडू नये म्हणून नियमावली करणे आवश्यक आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय हे स्वर्गीय लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबाने खूप मेहनतीतून उभारलेले आहे. नावाजलेले रूग्णालय आहे. तिथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळे चूक आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता.”
• भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू...
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.
मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.
═══════⊰⊱✧❂✧⊰⊱══════

0 Comments