पुणे (शशिकांत पाटोळे) l दि; २८ मार्च २०२६ : नाशिकच्या मातीत घडलेले पैलवान हर्षवर्धन (हर्षद) सदगिर हे आज महाराष्ट्रातील कुस्तीविश्वात एक दमदार नाव आहे. २०२२ आणि २०२६ या दोन्ही वर्षांत “महाराष्ट्र केसरी” किताब पटकावत त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची चांदीची गदा जिंकली आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
पण या यशामागे फक्त मैदानावरील झुंज नाही, तर आयुष्यभराचा संघर्ष दडलेला आहे. २०१९-२० साली महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हर्षद सदगिर यांनी युनिव्हर्सिटी आणि नॅशनल स्पर्धांमध्येही पदके मिळवली. ते केवळ कुस्तीमध्येच नव्हे, तर शिक्षणातही तितकेच प्रगल्भ आहेत. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करत त्यांनी “हुशार आणि समर्पित पैलवान” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
इतकं मोठं यश मिळवूनही, शासकीय नोकरीसाठी त्यांना अनेक वेळा सरकारकडे मागणी करावी लागली. पण दुर्दैवाने, या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं. ही वेदना आणि अन्यायाची भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली. आणि त्यातूनच त्यांनी पुन्हा एकदा “महाराष्ट्र केसरी होऊनच दाखवायचं” ही जिद्द उराशी बाळगली.
मार्च २०२६ मध्ये वाघोली येथे त्यांनी पुन्हा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आणि आपल्या जिद्दीचं प्रत्यंतर दिलं. विजयानंतर त्यांनी पत्रकार आणि मीडियासमोर आपल्या नोकरीच्या प्रश्नाबाबतची खंत स्पष्टपणे मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि विधानभवनातील आमदार-नेत्यांची भेटही घेतली, पण आजही त्यांच्या नोकरीबाबतचा प्रश्न अनुत्तरितच आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, वाघोली स्पर्धेदरम्यान त्यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. पण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी, शौकीन आणि चाहत्यांनी त्यांना भावनिक विनंती केली — “तुम्ही कुस्ती सोडू नका!”
या प्रेमाचा आणि विश्वासाचा मान राखत, पै. हर्षद सदगिर यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला… आणि आता त्यांनी एक नवीन स्वप्न उराशी बाळगलं आहे — ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं! हा प्रवास फक्त एका खेळाडूचा नाही…
हा आवाज आहे त्या प्रत्येक कुस्तीगिराचा, जो मैदानात देशासाठी लढतो पण मैदानाबाहेर स्वतःच्या भविष्यासाठी झुंज देतो. आज प्रश्न फक्त हर्षद सदगिर यांचा नाही… प्रश्न आहे संपूर्ण व्यवस्थेचा, खेळाडूंना मिळणाऱ्या न्यायाचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीच्या भविष्यासाठीचा!
• हा लढा आता पदकांचा नाही…हा लढा आहे सन्मान, हक्क आणि अस्तित्वाचा!

0 Comments