
पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छ पुणे संकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ या अभिनव स्वच्छता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ही स्पर्धा प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यात राबविण्यात येणार असून, शहरातील स्वच्छता, पर्यावरणपूरक सवयी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला महापौर मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर मा. श्री. परशुराम वाडेकर, सभागृह नेते मा. श्री. गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते मा. श्री. निलेश निकम, महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (ज) मा. श्रीमती पवनीत कौर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मा. श्री. अविनाश सकपाळ, उपायुक्त परिमंडळ दोन मा. श्री. संतोष वारोळे, सहाय्यक उपआयुक्त मा. श्री. कैलास केंद्रे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, हॉटेल्स व सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शांना अभिवादन करत, स्वच्छ-हरित-सुंदर पुण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’च्या माध्यमातून अधिक दृढ करण्यात आला.
0 Comments