• भाजप सरकारचा काळे यांनी केला तीव्र निषेध: नजरकैद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.
पिंपरी-चिंचवड, दि. ४ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांना ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस नजरकैदेत ठेवण्यात आल्याने त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
सतीश काळे यांनी यापूर्वी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संविधानिक आणि लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनांदरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा, जाळपोळ किंवा तोडफोड केलेली नसताना केवळ राजकीय भूमिका आणि आंदोलन करण्याच्या अधिकारामुळे नजरकैदेत ठेवणे हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा,सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा आणि शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आहे. हा अधिकार अबाधित ठेवणे ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, कोणताही गुन्हा न करता किंवा हिंसक कृत्य न करता एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली सलग दोन दिवस नजरकैदेत ठेवणे योग्य नाही,असे सतीश काळे यांनी स्पष्ट केले.
“माझ्या आंदोलनांचा इतिहास संविधानिक आणि लोकशाही मार्गाचा आहे. हिंसा,जाळपोळ किंवा तोडफोडीचा कोणताही प्रकार केलेला नसताना केवळ माझ्या राजकीय-सामाजिक भूमिकेमुळे मला नजरकैदेत ठेवणे हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. सरकारच्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो,” असे सतीश काळे यांनी म्हटले.


0 Comments