Hot Posts

6/recent/ticker-posts

मोशी दुर्घटनेप्रकरणी अँथनी लाराच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी.

 

• पोलीस आयुक्तांना निवेदन दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

        पिंपरी चिंचवड-: मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार कंपनी अँथनी लाराच्या सर्व संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

          या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे आणि उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

          निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत ९ कामगारांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी आतापर्यंत केवळ प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या मुख्य संचालकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

          संभाजी ब्रिगेडने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेची अंतिम जबाबदारी कंपनीच्या मालकांची व संचालकांची असते असे नमूद केले आहे. त्यामुळे केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून मुख्य जबाबदार व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

         या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनीच्या सर्व संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्यांना तात्काळ अटक करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

       दरम्यान या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments