Hot Posts

6/recent/ticker-posts

वारकरी सांप्रदायात मनुवाद्यांची घुसखोरी चिंतेची बाब – भारत महाराज जाधव.


• संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारकरी प्रबोधन प्रशिक्षण शिबिर संपन्न.

        पिंपरी चिंचवड : वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. नरेंद्रसिंह सोखी गुरुजी यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त किवळे येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारकरी प्रबोधन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेवर वाढत्या राजकीय हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

          संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष निरंजन सोखी यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबवला. समाजामध्ये खरा वारकरी धर्म आणि संत परंपरेचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

           या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.भारत महाराज जाधव यांनी वारकरी संप्रदायाच्या मूलभूत विचारांवर भाष्य करताना सांगितले की,वारकरी संप्रदाय हा ना पुरोगामी आहे ना प्रतिगामी, तर तो संत नामदेव,ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या समतेच्या विचारांचा जागर आहे. संतांनी समाजाला दिलेला समतेचा संदेश अंधश्रद्धा आणि कर्मकांडापासून दूर ठेवणारा आहे. मात्र सध्याच्या काळात वारकरी संप्रदायात मनुवादी प्रवृत्तींची घुसखोरी होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

        दुसरे मार्गदर्शक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी तथागत गौतम बुद्ध ते संत तुकाराम असा वारकरी परंपरेचा प्रवास उलगडून सांगितला.संत परंपरेतील हजारो वर्षांचा समतेचा विचार त्यांनी सोप्या आणि प्रभावी भाषेत मांडला.भक्तीमार्गातून ज्ञान आणि समतेकडे जाणारा हा प्रवास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       यावेळी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीही वारकरी संप्रदायात होणाऱ्या सनातनी विचारांच्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त करत, वारकऱ्यांनी संतांचा मूळ विचार पुढे नेण्याचे आवाहन केले.

         कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रमुख मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह शेकडो वारकरी आणि मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहूराज कदेरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments