┈┉┅━ ❍❀🟣❀❍ ━┅┉┈
आपण बराचवेळ एकाच जागी एकाच स्थितीत बसलो किंवा तासंतास ए.सी खोलीत बसलो, तर आपल्या हातापायाला मुंग्या येतात. खरंतर, हातापायांना मुंग्या येणे किंवा झिणझिण्या येणं हे अगदीच सामान्य आहे. काहीवेळा ही समस्या तात्पुरती असते, पण वारंवार असे वाटत राहिल्यास ती शरीरातील काही त्रासांचे किंवा आजारांचे संकेत असू शकते. या समस्येकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. हातापायांना वारंवार मुंग्या येत असल्या तरी आपण या समस्येकडे फारसे लक्ष न देता अवघडले असेल असे म्हणून दुर्लक्ष करतो.
काही वेळाने या मुंग्या जातातही त्यामुळे हे फारसे काही गंभीर नाही असे आपल्याला वाटते. मात्र हातापायाला मुंग्या येण्यामागे व्हिटॅमिन्सची कमतरता, डायबिटीस, कोलेस्टेरॉल वाढणे अशी अनेक कारणे असू शकातात. आपल्याला याबाबत माहिती नसल्याने केवळ अवघडले असेल म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन 'बी' आणि व्हिटॅमिन 'ई' ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे ते समजत नाही. आता ही समस्या दूर करायची तर त्यावर इतर उपायांसोबतच हातापायांची मालिश करणे हा देखील उपाय फायदेशीर ठरतो. हातापायांवर मुंग्या आल्यानंतर नेमके काय उपाय करावेत आणि कोणत्या तेलाने मसाज करावा याबद्दल अधिक माहिती सांगणारा इंस्टाग्राम व्हिडीओ डॉ. सलीम जैदी यांनी नुकताच शेअर केला आहे.
• हातापायांना सतत मुंग्या आणि झिणझिण्या येणे...
डॉ. सलीम जैदी यांच्यामते, अनेकदा असं होतं की हात-पाय सुन्न होतात आणि त्यानंतर झिणझिण्या देखील येतात, जणू हात-पायांवर मुंग्या चढल्यासारखं वाटतं. जमिनीवर बसलो असताना किंवा झोपेत असतानाही अचानक हात-पाय सुन्न, झिणझिण्या येतात आणि जड वाटायला लागतात, जणू शरीरात ताकदच नाही असं वाटतं. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल, तर त्यामागचं कारण नसांवर येणारा दबाव किंवा नसांची कमजोरी असू शकते. बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसणं, पाय पोटाशी घेऊन बसणं किंवा पायावर पाय ठेवून बसणं यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. याशिवाय, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता, खराब रक्ताभिसरण, नसांवर दबाव येणं किंवा मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षणे ही देखील हात-पाय सुन्न होण्याची कारणं असू शकतात.
• हातापायांना येणाऱ्या मुंग्या - झिणझिण्या कमी करण्यासाठी काय करावं ?
१). रोज १५ ते २० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा, स्ट्रेचिंग केल्यानेही फायदा होतो; यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हातापायांना मुंग्या आणि झिणझिण्या येण्याची समस्या कमी करण्यास मदत होते.
२). आहारात व्हिटॅमिन बी - १२ युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. पनीर, दही, दूध यांचा समावेश रोजच्या आहारात करावा, यामुळे नसांना मजबुती येण्यास मदत होते.
३). शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे देखील हातापायांना मुंग्या येण्याची समस्या सतावू शकते. यासाठी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उभे राहा. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळून मुंग्या आणि झिणझिण्यांपासून आराम मिळतो.
४). हातांच्या पंजांना आणि पायांच्या तळव्यांना तिळाच्या तेलाने मसाज करा, यामुळे सुन्नपणा व झिणझिण्यांपासून आराम मिळतो.
┈┉┅━ ❍❀🟣❀❍ ━┅┉┈


0 Comments