Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री 'अशोक सराफ' यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....! जाणून घ्या त्याच्यांविषयी थोडक्यात माहिती....- शशिकांत पाटोळे

 

      
      मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला.

      मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ७८ वर्षे पूर्ण केली आहे. मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत.

       अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप कुमार यांनी सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या टायमिंगसाठी शाबासकी दिली होती. 

• का म्हटले जाते अशोक सराफ यांना मामा?
       अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने अशोकमामा असे म्हणतात. मात्र अशोकमामा हे नाव कसे पडले यामागे एक रंजक कहाणी आहे. एका मुलाखतीत अशोक मामाचे नामकरण कशा पद्धतीने झाले, त्याचा एक किस्सा खुद्द अशोक सरफांनी सांगितला होता. ते म्हणाले होते, "काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबोरबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ... पण तू त्यांना अशोकमामा म्हणायचे आणि तेथूनच मला अशोकमामा म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारु लागले."  

       दरम्यान, सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असून, तो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, अशा या दिग्गज अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!


Post a Comment

0 Comments