पिंपरी, दि. १५ जुलै २०२४ :- महापालिकेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अर्ज स्विकृती केंद्रांवर आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज भरण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील त्यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज भरणे तसेच स्विकृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी १० जुलै २०२४ पासून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध ठिकाणी १२३ अर्जस्विकृती केंद्र उभारण्यात आली असून आज आयुक्त सिंह यांनी काही केंद्रांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज भरण्यासंदर्भातील प्रकीयेबाबत पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी वेळेची व श्रमाची बचत व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.




0 Comments