मावळ, दि.12-:सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या मावळ लोकसभेच्या निवडणूक केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून सर्व पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून आज सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. प्रारंभी सर्व ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणा-या ७ हजार ६९८ बॅलेट युनिट, २ हजार ५६६ कंट्रोल युनिट आणि २ हजार ५६६ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. बसेस, जीप तसेच इतर वाहनांवर केंद्र क्रमांक दर्शविण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना वाहनांमध्ये बसवून केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिंचवड तसेच पिंपरी येथील साहित्य वितरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विधानसभा मतदारसंघ निहाय संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य वाटप.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ मतदान केंद्रांसाठी २७ टेबलद्वारे मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए.आर कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणाहून करण्यात आले. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार ६३२ बॅलेट युनिट, ५४४ कंट्रोल युनिट आणि ५४४ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले.
मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले ३ हजार ४०० अधिकारी कर्मचारी १ हजार २०० पोलीस कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. यासाठी ८६ एसटी बसेस, १५ मिनी बसेस, २० जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्याचे वितरण.
कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले. यासाठी ४७ टेबल ठेवण्यात आले होते. १४१ कर्मचा-यांची नेमणूक साहित्य वाटपासाठी करण्यात आली होती. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. वाहतुकीसाठी ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
उरण विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्याचे वितरण संपन्न.
उरण विधानसभा मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले. यासाठी २५ टेबल ठेवण्यात आले होते. तर वाटपासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. ३४४ मतदान केंद्रे असणा-या या विधानसभा मतदार संघासाठी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट आणि ३४४ व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले आहेत. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत्त. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्याचे वाटप
मावळ विधानसभा मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनीअरिंग कॉलेज या ठिकाणी पार पडले. यासाठी ४५ टेबल मांडण्यात आले होते. या विधानसभा मतदार संघात ३९० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ८०२ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार १७० बॅलेट युनिट, ३९० कंट्रोल युनिट आणि ३९० व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. यासाठी ४९ एसटी बसेस, २७ मिनी बसेस, २० जीप, ३ ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य वितरीत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ५४९ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून करण्यात आले आहे. यासाठी ४८ टेबल लावण्यात आले होते तर साहित्य वाटपासाठी २०० कर्मचारी, ५० समन्वय अधिकारी आणि मतदान यंत्र व्यवस्थापनासाठी ५० स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५४९ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ६४७ बॅलेट युनिट, ५४९ कंट्रोल युनिट आणि ५४९ व्हीव्हीपॅट सुपूर्द करण्यात आले. त्यासाठी १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया संपन्न.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ४०० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथून करण्यात आले. यासाठी १६ टेबल मांडण्यात आले होते. तर १२७ कर्मचारी आणि १० समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती साहित्य वाटपासाठी करण्यात आली होती. या विधानसभा मतदारसंघात १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांवर १ हजार २०० बॅलेट युनिट, ४०० कंट्रोल युनिट आणि ४०० व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे. मतदान अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

0 Comments